( गावखडी / वार्ताहर )
“श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!” च्या जयघोषात ढोल-ताशांचा गजर, भक्तिमय वातावरण आणि श्रावणातील पावसात श्री स्वामी समर्थ यांच्या पालखी सोहळ्याने मेर्वी गावात भक्तिरस ओसंडून वाहिला. आज श्री स्वामी समर्थ पालखीत विराजमान होऊन सोहळा अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने संपन्न झाला.
श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथून ही पवित्र पालखी श्री विठ्ठल मंदिर शेजारी असलेल्या सुतारवाडी (कणकवली) येथून विशेष आयोजनात आणण्यात आली. मठाचे अध्यक्ष श्री गुरुदास गंगाराम मेस्त्री यांना स्वामी समर्थांचे आदेश लाभल्यानंतर पालखी मेर्वी मठात आणण्याचे ठरले.
ही पालखी गुरुदास गंगाराम मेस्त्री, मदन बाळकृष्ण पांचाळ, गुरुदास लवू पांचाळ यांच्या हस्तकौशल्यातून आणि श्री स्वामी भक्त परिवाराच्या सहकार्याने साकारली गेली. यानंतर ती श्री स्वामी समर्थ मठ, मेर्वी (ता. रत्नागिरी) येथे भक्तांच्या सेवेसाठी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री स्वामी समर्थ परिवार, राठीवडे यांच्यावतीने पुरोहित प्रकाश फडके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ मूर्ती व पादुकांवर अभिषेक, पूजा आणि मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली.
विशेष म्हणजे, पालखी आगमनाच्या वेळी मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा सुरू असतानाही, श्रींच्या कृपेने ते थांबले, आणि संपूर्ण सोहळा निर्विघ्न पार पडला. त्यामुळे “अशक्य हि शक्य करतील श्री स्वामी समर्थ” याचा अनुभव भक्तांनी प्रत्यक्ष घेतला.
या सोहळ्याला मोठ्या संख्येने स्वामी समर्थ भक्त उपस्थित होते. त्यामध्ये पुजारी सहदेव पावसकर, शामसुंदर कृष्णा मेस्त्री, महेश सखाराम वायंगणकर, पार्थ सुधीर मापारी, बाबाजी रामचंद्र सावंत, अनिल अमृत कुर्ले, विद्याधर दशरथ पाटकर, महेश राजाराम गुराम, महेश काशीनाथ माळकर, अद्वैत मिरजकर, नम्रता गुरुदास मेस्त्री, सुहासिनी शामसुंदर मेस्त्री, शैलेश शंकर माळकर, प्रसाद मिरजकर, प्रिया मिरजकर, सदानंद परुळेकर, प्रसाद आठले, कोमल आठले, कविता पवार, श्रद्धा वाडीये, आबा ठाकूर, दिलीप मेस्त्री यांचा समावेश होता.
फोटो: श्री स्वामी समर्थ मठ, राठीवडे (ता. मालवण) यांच्यावतीने रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठास पालखी सुपूर्त करताना अध्यक्ष श्री गुरुदास गंगाराम मेस्त्री, सहदेव पावसकर आणि श्री स्वामी भक्तगण.
(छायाचित्रकार: दिनेश पेटकर, गावखडी)