(दापोली)
“विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि योग्य दिशा दिल्यास त्यांच्या गुणवत्तेत मोठा सकारात्मक बदल घडतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचे आपले उद्दिष्ट असून, त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल,” असे मत गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी व्यक्त केले. व्हिजन दापोली अंतर्गत मुख्य समिती, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांची संयुक्त आढावा बैठक आज दापोली येथे पार पडली.
यावेळी श्री. मंडलीक यांनी सांगितले की, “गुणवत्तावाढीसाठी कोणत्या विषयात विद्यार्थ्यांची कामगिरी मागे आहे, याचे विश्लेषण करून त्या विषयावर विशेष भर देण्याची गरज आहे. ‘व्हिजन दापोली’मुळे विद्यार्थ्यांच्या एकूण गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. या अनुभवाचा उपयोग अन्य स्पर्धा परीक्षांसाठीही होतो आहे.”
१००% सेवापुस्तक अद्ययावत करण्याचे निर्देश
या बैठकीत प्रशासनिक नियोजनाचा आढावा घेताना मंडलीक यांनी पुढील सूचना केल्या: जुलै अखेरपर्यंत तालुक्यातील सर्व शाळांचे १००% सेवापुस्तके अद्ययावत करावीत, केंद्रनिहाय नियोजन करून कामांची कार्यवाही वेळेत पार पाडावी, पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार असून, यासाठी आवश्यक माहिती वेळेत द्यावी. नवभारत साक्षरता मोहिमेंतर्गत तालुक्याचे २६७८ अपूर्ण साक्षर नागरिकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सक्रिय भूमिका घ्यावी.
आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, व्यायाम व वाचन संस्कृती याविषयी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “आरोग्य चांगले असेल आणि वाचनाची सवय असेल, तर कोणतेही उद्दिष्ट गाठता येते,” असे त्यांनी नमूद केले.
बैठकीत विषय समित्यांचे पुनर्गठन, शिष्यवृत्ती कार्यशाळांचे आयोजन, आणि नियमित सराव चाचण्यांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी तालुक्यातील शैक्षणिक व प्रशासकीय प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीच्या शेवटी व्हिजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय शिरसाट यांनी “व्हिजन ही केवळ योजना नसून विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करणारी चळवळ आहे,” असे म्हणत उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकीस विस्तार अधिकारी मेघा पवार, सचिव सुनील कारखेले, सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि व्हिजन दापोलीच्या मुख्य समितीचे सदस्य उपस्थित होते