(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयावर धडक दिली. जिल्ह्यात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांसमोर विविध प्रश्न उपस्थित करत, ५ मेपर्यंत कारवाई न झाल्यास मनसे कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन छेडण्यात येईल, असा तीव्र इशारा देण्यात आला.
रत्नागिरीसारख्या जिल्हा ठिकाणी पूर्णवेळ उपप्रादेशिक अधिकारी नसल्याने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना मोकळे रान मिळाले आहे. एमआयडीसीमधील काही कंपन्या थेट खाडी व समुद्रात प्रदूषित पाणी सोडत असून, याचा थेट परिणाम मत्स्य प्रजननावर होत आहे. यामुळे मत्स्यउत्पादनात घट होत असल्याची माहिती मनसेने दिली.
शहरातील साळवी स्टॉप परिसरात दररोज संध्याकाळी दुर्गंधी पसरते, जी एखाद्या मत्स्य प्रक्रिया कारखान्यातून येत असल्याचा संशय आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
रत्नागिरी नगरपालिकेचे सांडपाणीही थेट समुद्रात सोडले जात असल्यामुळे मांडवी खाडी प्रदूषित होत आहे. यासंदर्भात मनसेने पालिकेवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, एमआयडीसीमध्ये पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था नसल्याने अनेक कंपन्यांकडून थेट सांडपाणी समुद्रात सोडले जात असल्याचेही निदर्शनास आणले.
लांजा तालुक्यातील काही गावांमध्ये सुरू असलेल्या स्टोन क्रशरमुळे स्थानिकांना त्रास होत असून, या संदर्भातही तक्रारी असूनदेखील अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
या वेळी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, महिला शहर अध्यक्ष सुष्मिता सुर्वे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.