(रत्नागिरी)
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे माजी विभागप्रमुख आणि कला शाखेचे माजी उपप्राचार्य डॉ. अतुल यशवंत पित्रे हे नियत वयोमानानुसार ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या गौरवशाली सेवापर्यंतच्या प्रवासाचा सन्मान करण्यासाठी महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य कक्षात विशेष शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयाच्यावतीने आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी डॉ. पित्रे यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.
प्राचार्य डॉ. साखळकर यांनी आपल्या भाषणात डॉ. पित्रे यांच्या 35 वर्षे 8 महिने 22 दिवसांच्या दीर्घ सेवेला उजाळा देत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. पदवी शिक्षण गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर, गोवा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. पित्रे यांनी ९ ऑक्टोबर १९८९ रोजी इंग्रजी विभागात अध्यापनास प्रारंभ केला होता. त्यांनी महाविद्यालयाच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. NAAC व IQAC कार्यासाठी प्रभावी ‘हेल्पडेस्क’ संकल्पना, तसेच स्वायत्त महाविद्यालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आपल्या मनोगतात डॉ. पित्रे यांनी कार्यकाळातील सहकार्याबद्दल सर्व सहकारी प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. रामा सरतापे यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. यावेळी पतसंस्थेच्यावतीने डॉ. अजिंक्य पिलणकर यांनी डॉ. पित्रे यांना बचत खात्याचा धनादेश सुपूर्द केला. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी डॉ. पित्रे यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत, सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या पुढील जीवनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.