( दापोली )
दापोली तालुक्यातील मुर्डी समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी दुर्मीळ आणि आकर्षक ‘मुखवटाधारी बुबी’ (Masked Booby) पक्षी आढळून आला. स्थानिक रहिवासी आणि वाईल्डलाइफ बचाव कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे या थकलेल्या आणि अशक्त पक्ष्याला वेळेवर मदत मिळाली आणि त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.
या दुर्मीळ पक्ष्याला ‘मोठा समुद्री कावळा’ असेही म्हणतात. तो मुख्यतः हिंद, अटलांटिक आणि प्रशांत महासागराच्या खोल समुद्रातील दुर्गम भागांमध्ये आढळतो. भारतात मात्र तो फारच क्वचित विशेषतः वादळानंतर वा अन्नाच्या शोधात किनारपट्टीवर दिसतो. मुर्डी येथील शेतकरी वैभव झगडे यांना हा पक्षी आपल्या शेताजवळील भागात हालचाल न करता थकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचे पंख पूर्णपणे ओले झालेले होते आणि तो फारसा प्रतिसाद देत नव्हता. झगडे यांनी तत्काळ ही माहिती वनविभागाला कळवली. वनविभागाच्या समन्वयाने वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर संस्थेचे स्वयंसेवक मनीत बाईत आणि प्रतीक बाईत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पक्ष्याची काळजीपूर्वक तपासणी केली आणि त्याला आवश्यक ती प्राथमिक उपचार देत विश्रांती दिली.
संध्याकाळी चारच्या सुमारास या पक्षाला आंजर्ले समुद्रकिनारी पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. समुद्राच्या दिशेने उडण्यापूर्वी त्याने थोडा वेळ स्थिर राहून नंतर भरारी घेतली आणि उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात जल्लोष केला. या दुर्मीळ जीवाला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून, निसर्ग संवर्धनासाठी सामान्य नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची ठरते, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.