(लांजा)
शहरातील आसगे कोर्ले फाटा येथे लांजा पोलिसांनी नियमित नाकाबंदी केली असता एक दुचाकीस्वार संशयास्पदरीत्या पोलिसांना चुकवून पुढे निघून गेला. पोलिसांनी तत्काळ ई-चलन अॅपद्वारे दुचाकीची माहिती तपासली असता, ती दुचाकी रत्नागिरी येथून चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयिताचा ठावठिकाणा लावून त्याला अटक केली.
ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. नाकाबंदी दरम्यान एमएच ०८ एएस २४१८ क्रमांकाची जुपिटर दुचाकी घेऊन एक युवक आला. मात्र, पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न करताच तो थांबण्याऐवजी भरधाव वेगाने पुढे निघून गेला. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याच्या दुचाकीचा तपशील ई-चलन अॅपवरून तपासला असता ती दुचाकी २०२४ मध्ये चोरीला गेली असल्याचे समोर आले. या संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरून पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई किशोर पवार व हवालदार साक्षी भुजबळराव यांनी शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर संबंधित युवक लांजा तालुक्यातील आगरवाडी परिसरात आढळून आला. त्याला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपासासाठी त्याला रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. लांजा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे रत्नागिरीतून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.