(दापोली)
दापोली तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा कहर केला. या पावसामुळे वाकवली गावामध्ये विजेचा जबरदस्त तडाखा बसून एका गोठ्याला आग लागली. यात गोठा पूर्णतः जळून खाक झाला असून जनावरेही जखमी झाली आहेत. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
वाकवली येथील शरद विठोबा जंगम यांच्या गुरांचा गोठा वादळी वाऱ्यासोबतच आलेल्या विजेचा बळी ठरला. विजेचा फटका बसताच गोठ्याला आग लागली आणि काही क्षणांतच गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. घटनेदरम्यान गोठ्यात अनेक गुरे असल्याने जीवितहानीची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत धाव घेतली आणि गुरांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
या आगीत गोठ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जनावरांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच गावचे तलाठी, पोलीस पाटील आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले.
कोकणात हवामानातील अचानक बदलामुळे शेतकरी आणि पशुपालकांचे हाल सुरू असून शासनाने अशा नैसर्गिक आपत्तींमधून झालेल्या नुकसानीसाठी तातडीची मदत जाहीर करणे आवश्यक आहे.

