(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर येथील उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाचे श्री. संतोष भागवत हे नियत वयोमानानुसार ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या ३९ वर्षांहून अधिक काळाच्या सेवेला सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी देवरुख येथील माटे भोजने हॉलमध्ये भावनिक वातावरणात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. रोहन बने, ज्येष्ठ समाजसेवक श्री. युयुत्सु आर्ते, माजी जि. प. सदस्य श्री. बापू उर्फ संदेश शेट्ये, ज्येष्ठ उद्योजक श्री. बबनराव पटवर्धन, तसेच श्री. भागवत यांचे कुटुंबीय, सहकारी, हितचिंतक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी श्री. भागवत यांच्या कर्तृत्व, पारदर्शक कार्यशैली आणि सेवाभावाचे मनपूर्वक कौतुक केले.
सेवेचा अभिमान आणि सामाजिक बांधिलकी
आपल्या मनोगतात श्री. भागवत यांनी आपल्या सेवायात्रेचा मागोवा घेत सांगितले की, “१९८६ साली कोकणातील दुर्गम भागात सेवा सुरू केली तेव्हा तांत्रिक सुविधा फारशा नव्हत्या. एस.टी. बस हाच प्रवासाचा एकमेव आधार होता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मी कधीही कामात कसूर केली नाही, याचा मला अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले, “भूमी अभिलेख खात्यातील काम हे केवळ शासकीय न राहता, लोकाभिमुख आणि समाजजागृतीपर व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न केला. पोटहिस्से मोजणीतील अडचणी, जनतेतील अज्ञान, अधिकारांची अंमलबजावणी – या सर्व गोष्टी सोडवण्यासाठी कायम सज्ज होतो.”
श्री. भागवत यांनी आपल्या कार्यकाळात एनरॉन प्रकल्प (गुहागर), सिंधुदुर्गातील चिपी आंतरराष्ट्रीय विमानतळ, लांजा-देवरुख जलसंधारण प्रकल्प, खोपी-शिरगाव-कुंभाड धरण कालवे, तसेच लोटे-परशुराम MIDC चे भू-संपादन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांत सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय, जिल्हाधिकारी कार्यालय, MIDC आणि इतर आस्थापनांमध्ये प्रतिनियुक्तीद्वारेही जबाबदारी पार पाडली. चिपळूण आणि लांजा तालुक्यांचा अतिरिक्त पदभारही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला.
“वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांची साथ आणि कुटुंबीयांचा आधार यामुळेच ही प्रदीर्घ सेवा शक्य झाली,” असे सांगत श्री. भागवत यांनी सर्व सहकाऱ्यांचे आणि मित्रपरिवाराचे मनापासून आभार मानले. “सेवानिवृत्तीनंतरदेखील मी जनसामान्यांसाठी वेळ देणार आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
एक आदर्श सेवाभावी अधिकारी म्हणून ओळख
श्री. भागवत यांची कारकीर्द प्रामाणिकपणा, तंत्रशुद्धता आणि सामाजिक जाणीव यासाठी ओळखली गेली. त्यांच्या निरोप समारंभाने उपस्थितांच्या मनात गौरव, आदर आणि भावुकतेचे क्षण निर्माण झाले होते.