(रत्नागिरी / प्रतिनिधी)
एप्रिलच्या अखेरीस कमाल तापमानात किंचित घट होत असली तरी किमान तापमानात वाढ आणि वाढती आर्द्रता यामुळे जिल्ह्यातील उकाडा अजूनही नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. तापमानाचा पारा काहीसा खाली आला असला तरी हवेत वाढलेल्या ओलाव्यामुळे घामाच्या धारांनी अंग चिंब भिजत असून, उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या आठवडाभर कमाल तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे; मात्र किमान तापमानात सुमारे १ ते १.६ अंश सेल्सिअसने वाढ कायम राहणार आहे. त्याचबरोबर आर्द्रतेचे प्रमाण ६२ ते ६९ टक्क्यांच्या दरम्यान राहणार असल्याने उकाड्याची तीव्रता कमी होण्याऐवजी अधिकच जाणवणार आहे. आकाशात अधूनमधून मळभ दाटून येणार असल्याने वातावरण दमट आणि उष्ण राहण्याची चिन्हे आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात झालेल्या वाढीसोबतच आर्द्रतेतही लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, उन्हाचे चटके आणि घामाचा त्रास या दुहेरी संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा तब्बल ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता; मात्र सध्या त्यात थोडीशी घट झाली असली तरी उकाड्याचा परिणाम अजूनही तीव्रच आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागांत अधूनमधून हलक्या पावसाने हजेरी लावली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात केवळ तुरळक ठिकाणीच शिडकाव्याचे स्वरूप दिसून आले आहे. या हलक्या सरींमुळे उष्णतेत दिलासा मिळण्याऐवजी दमटपणात भर पडत आहे. येत्या आठवड्यात पावसाची ठोस शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले असले तरी यंदा मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा लवकर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तथापि, पावसाचे आगमन लवकर झाल्यास त्याचा कालावधी लांबण्याचा संभवही नाकारता येत नाही, अशीही सूचनाच तज्ज्ञांनी दिली आहे. सध्या वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या सरींची प्रतीक्षा लागून राहिली असून, ‘पाऊस पडला तरच दिलासा मिळेल’ अशा भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.

