(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन महिलांची तब्बल ३४ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव जयेश खानविलकर (रा. गोडावून स्टॉप, नाचणे, रत्नागिरी) असे असून, ही घटना मार्च २०२४ ते १७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कल्पवृक्ष रत्नागिरी हाऊसिंग सोसायटी, हिंदू कॉलनी येथे राहणाऱ्या शिल्पा सुभाष धुंदूर (वय ७५) यांच्याकडून ३० लाख, सविता सदानंद बाणे (रा. शिरगाव-बाणेवाडी) यांच्याकडून ३ लाख १४ हजार आणि स्नेहा शरदचंद्र अभ्यंकर (रा. वरची आळी, रत्नागिरी) यांच्याकडून १ लाख ७५ हजार रुपये उकळले. आरोपीने शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली या महिलांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून पैसे घेतले. मात्र, वेळेवर ना परतावा दिला गेला ना मूळ रक्कम. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शिल्पा धुंदूर यांनी २९ जून रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिस तपासात आरोपीवर याआधीही फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहर पोलिसांनी जयेश खानविलकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दीपक साळवी, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सागर वाळुंजकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर, अमित पालवे, अमोल भोसले, शरद जाधव आदींनी केली. प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिस अमलदारांकडून सुरू आहे.

