(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणातील महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण चिघळू लागले असून चिपळूणचे राजकारण यामध्ये केंद्रस्थानी आले आहे. एकीकडे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात परस्परस्पर्धा वाढली आहे, तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्तेही पालकमंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत आहेत.
चिपळूणमधील शिंदे गटाचे सात माजी नगरसेवक नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय खासदार नारायण राणे यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री निधी न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत संघर्षाचे नाट्य सुरू झाले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांना लक्ष्य करत, त्यांच्या विरोधात प्रशांत यादव यांना पक्षात घेण्याचे खुले निमंत्रण दिले. राजापूरचे आमदार किरण सामंत यांनीही यादव यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेशाबाबत चर्चा केली. यादव जर शिंदे गटात सहभागी झाले, तर तो राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा झटका ठरू शकतो. दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आज अनेक नेते एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढून, खालच्या पातळीवर एकमेकांवर टीका करूनही आता एकत्र आले आहेत त्यामुळे कोणी कोणाला काय सांगावे?
प्रत्युत्तरांची रणधुमाळी
मंत्री उदय सामंत यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार शेखर निकम यांनीही त्यांच्या स्टाईलने प्रत्युत्तर दिले. अजित यशवंतराव यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आल्यावर सामंत यांनी अप्रत्यक्ष टीका करत निकम यांना लक्ष्य केले होते. या सर्व घडामोडींमुळे चिपळूणचे राजकारण राज्यस्तरीय चर्चेचा विषय बनले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना कोकणातील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि कुरघोड्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.