(जाकादेवी / वार्ताहर)
मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे माजी खजिनदार तसेच दानशूर व्यक्तिमत्त्व कै. बाबाराम पर्शराम कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार सोहळा जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालयात कदम परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर हे उपस्थित होते. प्रारंभी कै. बाबाराम पर्शराम कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक परकर, कोषाध्यक्ष संदीप कदम, सीईओ किशोर पाटील, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, संचालक रोहित मयेकर, संचालक परेश हळदणकर, कदम परिवारातील अॅड. विनय आंबुलकर, अॅड. सौ. शाल्मली आंबुलकर, सौ. श्रावणी कदम, संस्थेचे हितचिंतक प्रकाश कांबळे, मुख्याध्यापक नितीन मोरे, ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार, क्रीडा शिक्षक संतोष सनगरे, किशोर नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी केले. त्यानंतर सन २०२६ च्या इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कला शाखेतील गुणवंत विद्यार्थी : कु. सुजल रमेश गराटे (७७.३३ टक्के), कु. समृद्धी रविंद्र खापरे (६५.३३ टक्के) आणि कु. नेहा नारायण किंजळे (६१.१७ टक्के).
वाणिज्य शाखेतील गुणवंत विद्यार्थी : कु. ओकार संदीप मायंगडे (८२.१७ टक्के), कु. वैष्णवी अनंत माचीवले (७६.६७ टक्के) आणि कु. आर्य अभिषेक जोशी (७६.३३ टक्के).
विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी : कु. वैष्णवी वासुदेव गोवळकर (७२.१७ टक्के), कु. अदिती अनिल जाधव (६५.३३ टक्के) आणि कु. सौरभ प्रशांत बळकटे (६३.८३ टक्के).
तसेच इयत्ता दहावी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या कु. साक्षी कुमार नाईक (८४.८० टक्के), कु. आर्या चंद्रकांत धनावडे (८३.२० टक्के) आणि कु. ऋत्वीराज आशिष नाचरे (८१.४० टक्के) यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
याशिवाय सीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या कु. वैष्णवी वासुदेव गोवळकर (९७.९६५ पर्सेंटाईल), कु. ऋतुजा राजेश निवेंडकर (८१.०११ पर्सेंटाईल) आणि कु. अदिती अनिल जाधव (७६ पर्सेंटाईल) यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, स्मृतिचिन्हे आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांचाही कदम परिवाराच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळाले.
यावेळी कदम परिवाराच्या वतीने अॅड. सौ. शाल्मली आंबुलकर यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने स्वतःची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. विविध व्यावसायिक व कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून उज्ज्वल करिअर घडवावे, असा संदेश त्यांनी दिला. तसेच कदम परिवार नेहमीच शाळा व संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही देत त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सीईओ किशोर पाटील आणि क्रीडा शिक्षक संतोष सनगरे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कै. बाबाराम कदम यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी विचार मांडले.
संस्थेचे अध्यक्ष सुनील मयेकर यांनी संस्थेच्या विकासात्मक वाटचालीचा आढावा घेताना कै. बाबाराम कदम यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच शिक्षण संस्थेबद्दल कायम आत्मीयता जपणाऱ्या कदम परिवाराचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले, तर सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कदम परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला गुणगौरव सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता जपण्याची प्रेरणा मिळाली.

