(जाकादेवी / वार्ताहर)
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करबुडे ग्रामपंचायतीमध्ये गावच्या सरपंच सौ. संस्कृती पाचकुडे यांच्या उपस्थितीत करबुडे केंद्रातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे चावडी वाचन व गणन घेण्यात आले.
महाराष्ट्र शासन राबवत असलेला निपुण महाराष्ट्र उपक्रम अतिशय स्तुत्य असून विद्यार्थ्यांना वाचन व गणनमध्ये सक्षम करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे मनोगत सरपंच सौ. पाचकुडे यांनी व्यक्त केले.
चावडी वाचन गणनसाठी केंद्रातील करबुडे बौद्धवाडी नं. १ शाळा, कुंभारवाडी, खापरे कोंड, पिंपळकोंड, रामगडे पाचकुडे, मुळगाव आणि धनावडेवाडी या शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
चावडी वाचन गणन यासाठी प्रत्येक शाळेतील इयत्ता दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पालक, ग्रामस्थ, शिक्षक यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनी अतिशय चांगल्या पद्धतीने वाचन केले तसेच गणितीय संख्याज्ञान व गणितिय क्रिया करून दाखविल्या.
ग्रामपंचायतच्या वतीने गेले वर्षभर क्रीडा स्पर्धा, नासा इस्त्रो, RTS,विज्ञान प्रदर्शन यामध्ये तालुका जिल्हा स्तरावर उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. अतिशय प्रेरणादायी व प्रोत्साहनात्मक असा हा कार्यक्रम घेण्यात आला. पालक, ग्रामस्थ, शिक्षक यांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले व अशाच प्रकारे कार्यक्रम चालू राहण्याचे अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाला उपसरपंच करिष्मा गोताड, गावचे पोलीस पाटील हरिश्चंद्र वेद्रे व साळवी तसेच मुळगाव शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री. कळंबटे, श्री.स्वप्नील साळवी, श्री.तांबे, केंद्रप्रमुख संतोष श्री.मोहिते, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामस्थ, पालक वर्ग उपस्थित होता.
सरपंच संस्कृती पाचकुडे यांनी नियोजन केलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र शाळा करबुडे बौद्धवाडी नं. १ चे मुख्याध्यापक श्री. सुशिल जाधव यांनी केले.