( देवरुख / प्रतिनिधी )
माणूस हा बुद्धिप्रधान प्राणी आहे. तो प्रज्ञाप्रधान आहे, तसाच प्रतिभावानही आहे. भावनात्मक अविष्काराची त्याची उर्मी प्रबळ आहे. भाषा पूर्वकाळात तो रंगरेषा, चित्रशिल्प पाषाण कोरून किंवा गाणीनाच वापरून आपल्या गडद भावभावना आविष्कृत करावयाचा. भाषेचा उगम व विकास झाल्यावर त्याला शब्दमाध्यम गवसले आणि तो कविता-कथाद्वारे अभिव्यक्त होऊन लागला. यामुळे साहित्याचे क्षेत्र विविध अंगाने संपन्न झाले. कला-साहित्य- संस्कृतीचे वैभव शेकडो वर्षांपासून प्रांताप्रांतातून संपन्नसमृद्ध होत चालले आहे.
शनिवार दि.१५ नोव्हेंबर, २०२५ रोजी देवरुखच्या डि-कॅड महाविद्यालयात पूर्वपिढीतील देवरुखचे सुपुत्र आणि नवसाहित्य संप्रदायाचे पोषक ‘मौज’कार प्रा. श्री. पु. भागवत यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘कला-साहित्य-संस्कृती- व्यवहार’. या विषयावर चर्चासत्र होणार असून त्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्यातील ‘अनुष्ठुभ् प्रतिष्ठान’ या वाङ्मयीन संस्थेने घेतली असून स्थानिक संयोजनाची जबाबदारी उद्योजक अजय पित्रे यांच्या नेतृत्वाखाली डि-कॅड कॉलेज, देवरुख यांनी घेतली आहे. डि-कॅड येथे आयोजित या चर्चासत्रात लोकसंस्कृती- भाषासंस्कृती- माध्यमसंस्कृती- वाङ्मयीनसंस्कृती या उपविषयांवर चार चर्चासत्रे होणार असून, महाराष्ट्रातील विविध भागातून निमंत्रित पंधरा वीस अभ्यासक आपली मते मांडणार आहेत. यामध्ये साहित्य अकादमी विजेते लेखक, रंगमंच नाटकाचे दिग्दर्शक, लोककला कलावंत, माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ, पत्रकार आणि वांङ्मय समीक्षक अशा अनेकांचा प्रत्यक्ष सहभाग या चार सत्रात असणार आहे.
“अनुष्टुभ्” वांङ्मयीन प्रतिष्ठानबाबत
‘अनुष्ठुभ्’ हा काव्यरचनेचा आद्य छंद, ‘रामायण महाभारता’दि प्राचीन महाग्रंथ या ‘अनुष्ठूभ्’ छंद वृत्तात रचले गेलेले आहेत. आधुनिक वाङ्मयातील अनेक वृत्तरचना या ‘अनुष्ठुभ’ छंदावर आधारलेल्या आहेत. पुढील काळात त्याचा अर्थ विस्तार होऊन समग्र वाङ्मय लेखनास ‘अनुष्ठुभ्’ म्हटले जाऊ लागले. विद्यमान काळातील ‘अनुष्ठुभ् प्रतिष्ठान’ हे १९७७ पासून अस्तित्वात आले. त्याच्या स्थापनेत ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांचा सहभाग होता. उदाहरणार्थ कवी कुसुमाग्रज, कवी पु. शि. रेगे, विचारवंत प्रभाकर पाध्ये, नरहर कुरुंदकर, समीक्षक गंगाधर पाटील, म. सू. पाटील इत्यादी. पुढे मनमाड या नाशिक जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन गावात ही मंडळी वेळोवेळी साहित्य चर्चा, वाङ्मय मंथन, काव्यास्वादासाठी एकत्र येत. अशा अनेक बैठकांमधून ‘अनुष्टभ्’ची स्थापना झाली आणि त्याच नावाने एक वाङ्मयीन नियतकालीकही प्रकाशित होऊ लागले. ‘अनुष्ठुभ् प्रतिष्ठान’तर्फे अनेक वांङ्मयीन उपक्रम उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात, तसेच मुंबई-ठाणे-अलिबाग परिसरात होत असतात.
अलीकडे कोकणातील जिल्ह्यातही या प्रतिष्ठानचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर ‘अनुष्ठुभ्’चे अध्यक्ष आहेत. देवरुखमध्ये प्रथमच त्यांच्यातर्फे चर्चासत्र आयोजित केले जात आहे, यासाठी कॉलेजचा मूळ परिसर हा विख्यात संपादक- समीक्षक दिवंगत प्रा. श्री. पु. भागवत यांचे जन्मस्थळ आहे. त्यांची जन्मशताब्दी गेल्या वर्षी संपन्न झाली, त्या निमित्ताने ‘कला-साहित्य-संस्कृती-व्यवहार’ या व्यापक विषयावर होणारे चर्चासत्र श्री. पु. भागवत यांना समर्पित केले जाणार आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन उद्योजक अजय पित्रे यांच्या शुभहस्ते होणार असून, बीजभाषक म्हणून प्रा. वसंत आबाजी डहाके उपस्थित राहणार आहेत.चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात स. ११:०० ते १२:०० या वेळेत ‘लोकसंस्कृती’ या विषयावर वक्ते डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. मुकुंद कुळे व शाहिद खेरटकर आपले विचार मांडणार असून, या सत्राचे अध्यक्षस्थान अतुल पेठे भूषवणार आहेत. दुसरे सत्र ‘भाषासंस्कृती’ या विषयावर दु. १२:०० ते १:०० या वेळेत डॉ. दीपक पवार व डॉ. नंदकुमार मोरे विचारमंथन घडवून आणणार असून, या सत्राचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंगडे असणार आहेत.
तिसरे सत्र दु. २:०० ते ३:०० या वेळेत ‘माध्यमसंस्कृती’ या विषयाशी संबंधित असून या चर्चासत्रात युवराज मोहिते, श्रीम. संपदा जोगळेकर व पराग वडके यांचा सहभाग असून, अध्यक्षस्थान डॉ. महेश केळुसकर भूषवणार आहेत. शेवट चौथे सत्र दु. ३:०० ते ४:०० यावेळी ‘वाङ्मयीनसंस्कृती’ या विषयाशी संबंधित असून, यामध्ये डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. आशुतोष पाटील, डॉ. शीतल पावसकर-भोसले आपले विचार मांडणार असून, या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. अविनाश सप्रे भूषवणार आहेत. समारोप प्रा. डॉ. सुरेश जोशी यांच्या भाषणाने होणार आहे. तरी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि वाङ्मयप्रेमींनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

