(संगमेश्वर /रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील साडवली गावात एका अभिनंदनाच्या बॅनरमुळे बुधवारी सायंकाळी राजकीय वातावरण अक्षरशः पेटून उठले. निवडणूक विजयानंतर लावण्यात आलेल्या बॅनरवरील कथित चिथावणीखोर मजकुरावरून दोन गट आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या व शस्त्रांसह जाब विचारण्यापर्यंत झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनताच देवरुख पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून बंदोबस्त वाढविला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे सेनेचे नेते अजित गवाणकर यांच्या पत्नी क्षमा जाधव-गवाणकर या साडवली पंचायत समिती गणातून विजयी झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनार्थ गावात बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवरील “मोठमोठे गार केले गंमतमधी” या वाक्यामुळे वादाची ठिणगी पडल्याचे सांगण्यात येते. हा मजकूर प्रतिस्पर्धी गटाला उद्देशून टोमणा असल्याची भावना व्यक्त होताच वातावरण चिघळले.
तक्रारीनुसार, विजय यशवंत धने उर्फ अभि धने आणि शुभम धने यांनी हातात कोयता व शिग घेऊन संतोष जाधव यांच्या घरी जाऊन बॅनर कोणी लावला, याचा जाब विचारला. संध्याकाळपर्यंत बॅनर न काढल्यास ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दीपक डोंगरे व १० ते १५ अनोळखी व्यक्तींनी घटनास्थळी येत हुज्जत घातल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेची दुसरी बाजूही तितकीच आक्रमक आहे. विजय यशवंत धने यांनी दिलेल्या प्रतितक्रारीत, बॅनरवरील मजकूर चिथावणीखोर असल्याने तो काढण्याची विनंती केल्याचे नमूद आहे. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बॅनर उतरवून उलटा करून ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर अजित गवाणकर व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जमावासह घटनास्थळी धडक देत शिवीगाळ व ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप प्रतितक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीनुसार अजित गवाणकर यांच्यासह १६ नामनिर्देशित आणि सुमारे ५० ते ५५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्परांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून गावात काही काळ दहशतीचे वातावरण पसरले होते. राजकीय अभिनंदनाचा बॅनर हा मतभेदांच्या पलीकडे आनंदोत्सवाचे प्रतीक असावा, अशी अपेक्षा असताना साडवलीत तोच वादाचे रणांगण ठरला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला असून, कायद्याचा धाक प्रस्थापित करण्याची जबाबदारी आता पोलिस प्रशासनावर आहे.

