(चिपळूण)
शहरातील गोवळकोट रोड परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या फायरिंगप्रकरणी अजूनही कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पहाटेच्या सुमारास अश्रफ तांबे यांच्या हायलाईफ इमारतीतील सदनिकेच्या स्वयंपाकघरात बंदुकीचा छर्रा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणाचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, छर्रा जप्तही केला. परंतु त्यानंतर १८ तास उलटून गेले असतानाही गोळी नेमकी कुठून आली, फायरिंग का झाले, आणि त्यामागचे हेतू काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हायलाईफ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या तांबे यांच्या फ्लॅटच्या स्वयंपाकघराच्या खिडकीची काच फुटली होती. सुदैवाने त्यावेळी स्वयंपाकघरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, या प्रकारामुळे शहरात दिवसाढवळ्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे की, भरवस्तीत आणि शेतीच्या मधोमध शिकार करण्यास कोणी येऊच कसे शकते? आणि ज्याठिकाणी निशाणा धरण्यात आला, त्या ठिकाणी घरे, कुटुंबीय आहेत, याचे भानही फायरिंग करणाऱ्याला नव्हते का?
प्रकरणात शिकारी कोण होते, नेमकी कोणती शिकार करण्यासाठी ते आले होते, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. फायरिंग आसपासच्या शेतातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी पोलिस तपासाने अजून कोणताही निष्कर्ष दिलेला नाही. या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करून नागरिकांची धास्ती दूर करण्याची मागणी जोर धरत आहे.