(चिपळूण / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अडरे (ता. चिपळूण) येथील श्री. अविनाश मनोहर पवार यांनी यूजीसी नेट या देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत सलग तीन वेळा उत्तीर्ण होण्याची हॅट्रिक पूर्ण केली आहे. जून 2024, डिसेंबर 2024 आणि डिसेंबर 2025 (अनुक्रमे जून 2024 – 92.27%, डिसेंबर 2024 – 89.41%, डिसेंबर 2025- 88.69%) या तीन सत्रांमध्ये त्यांनी यूजीसी नेट परीक्षा यशस्वीरित्या पार केली असून, सलग तिसऱ्यांदा “असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी”साठी पात्रता मिळवली आहे.
श्री. अविनाश पवार यांचे प्राथमिक व उच्च शिक्षण भौतिकशास्त्र विषयातील बीएससी (Physics) तर पदव्युत्तर शिक्षण एमबीए (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट) असे आहे. विशेष म्हणजे त्यांनी यूजीसी नेट परीक्षा एचआरएम, लेबर वेल्फेअर आणि इंडस्ट्रियल रिलेशन्स या विषयांत सलग तीन वेळा उत्तीर्ण केली आहे. यूजीसी नेट परीक्षा ही भारतातील सर्वाधिक स्पर्धात्मक आणि कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते.
दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, मात्र त्यापैकी मोजकेच उमेदवार यशस्वी होतात. सामान्यतः वर्ष ते दीड-दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण तयारीनंतर ही परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य होते. मात्र अविनाश पवार यांनी अवघ्या दीड वर्षांत सलग तीन वेळा यश संपादन करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
याआधी सन २०११ मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची सहाय्यक वाहतूक निरीक्षक (एटीआय) ही परीक्षा राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला होता. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष गौरवाची चर्चा होत असून, असे यश संपादन करणारे ते जिल्ह्यातील दुर्मिळ उदाहरण आहे.
अविनाश पवार यांच्या या शैक्षणिक कामगिरीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाने जिल्ह्यातील तरुण विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.

