(चिपळूण)
थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) सकाळी चिपळूण शहरात घडली होती. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विवेक लक्ष्मण पवार (वय ३७, रा. गांधी नगर, बहादूर शेख नाका) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, साजिद ए. रज्जाक मुकादम आणि वफा साजिद मुकादम या दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५२, ३५१(२), ३२४ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवेक पवार हे वरिष्ठ अधिकारी अंकुश घाटाळ यांच्या आदेशानुसार थकबाकी वसुलीसाठी पेठमाप, मुकादम मोहल्ला येथील साजिद मुकादम यांच्या घरी गेले होते. थकबाकी न भरल्याने कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू असताना वफा मुकादम यांनी संतापाच्या भरात बांबूच्या काठीने विद्युतमीटरचे नुकसान केले. त्यानंतर त्यांनी तीच काठी पवार यांच्या दिशेने झोडपली. हल्ल्याचा प्रतिकार करताना पवार जखमी झाले.
दरम्यान, कनेक्शन तोडण्याची कारवाई संपल्यानंतर बाहेर पडत असताना साजिद मुकादम यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून धमकी दिली. त्यानंतर पवार यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चिपळूण पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

