(चिपळूण)
चिपळूण शहरात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘पूरस्थिती मार्गदर्शन शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, चिपळूण नगर परिषद आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात पूर, नैसर्गिक आपत्ती आणि बचाव कार्याच्या महत्त्वाच्या बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर आणि एनडीआरएफचे कमांडर प्रमोदकुमार राय आदी मान्यवर उपस्थित होते. कमांडर राय यांनी पूरस्थितीतील धोके, प्रशासनाची भूमिका, नागरिकांचे योगदान व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.
एनडीआरएफच्या शरद साखरे यांनी लाइफ जॅकेट्स, रेस्क्यू रोप्स, इन्फ्लेटेबल बोट, प्राथमिक उपचार किट यांसारख्या उपकरणांची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह दिली. त्यानंतर जलतरण तलाव परिसरात दुर्घटनाग्रस्त व्यक्तींचा बचाव, बुडणाऱ्यांचा शोध, जलप्रलयानंतरची कार्यवाही यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. काही नागरिकांना यात सहभागी करून प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले, ही या शिबिराची खासियत ठरली.
या उपक्रमात एनडीआरएफचे सतीश देसाई, हनुमान बर्डे, सचिन मोरे, रवींद्र पवार, सतीश ढोबळ, तंबोली अकबर, राजेंद्र घोणके आदींनी सक्रीय सहभाग घेतला. ग्लोबल चिपळूण टुरिझमचे विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, आशुतोष जोगळेकर, प्रभाकर चितळे, समीर कोवळे यांच्यासह अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली.
पूर व आपत्ती प्रसंगी नागरिकांची सजगता वाढवणे, आपत्कालीन व्यवस्थांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक समन्वय बळकट करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे शिबिर घेण्यात आले होते. चिपळूणसह परिसरात वारंवार पूरस्थिती उद्भवत असल्याने अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे नागरिकांनी नमूद केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल चिपळूण प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.