(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने सुरू असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ या विशेष मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण शहरातील वालोपे परिसरात सापळा रचून तब्बल १० किलो १३८ ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणी तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई–गोवा महामार्गावरील रेल्वे स्टेशन फाट्याजवळील सबवे परिसरात ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिलेल्या विशेष सूचनांनुसार ३ मार्च रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर होते.
गस्तीदरम्यान वालोपे येथे एका रिक्षा चालक व मोटारसायकल स्वाराच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष चौकशी केली. त्यावेळी आकाश विजय जाधव (वय ३०), शिवकुमार भास्कर ठाकरे (वय ४८), शंकर विनोद पारदे (वय ३१, (सर्व रा. सुकीवली, ता. खेड) अशी आरोपींच्या झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ५३ हजार ४५० रुपये किमतीचा गांजा आढळून आला.
या कारवाईत गांजासह दोन वाहने व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ६८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी गांजाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना रंगेहात पकडले गेले.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर तसेच अंमलदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, दीपराज पाटील आणि प्रवीण होवाळ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

