(खेड)
लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक प्रा. लि. या रासायनिक उत्पादक कंपनीत आज (२६ जुलै) दुपारी साडेबारा वाजता भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत समीर कृष्णा खेडेकर (वय अंदाजे ३५) या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बॉयलरच्या एअर प्री-हिटरमध्ये अचानक दाब वाढल्याने स्फोट झाला. या वेळी समीर खेडेकर हे एकटेच संबंधित यंत्राजवळ कार्यरत होते. स्फोट इतका तीव्र होता की त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच मृत्यू झाला. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना लाईफ केअर रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कामथ ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
या घटनेबाबत कंपनीचे एचआर व्यवस्थापक सचिन खरे यांनी सांगितले की, “संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी तातडीने सुरू करण्यात आली आहे.” खेड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, औद्योगिक सुरक्षा आणि कामगार सुरक्षेच्या उपाययोजनांची चौकशी सुरु आहे.
विशेष म्हणजे, अपघात घडण्याच्या वेळी लोटे एमआयडीसी उद्योग भवन येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत औद्योगिक अपघात, प्रदूषण आणि स्थानिक रोजगार या विषयावर बैठक सुरू होती. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याने प्रशासनासह उद्योजक वर्गात खळबळ उडाली आहे.
मृत समीर खेडेकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश कांबळे यांचे जावई होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे.