( चिपळूण )
शहरातील गोवळकोट रोड परिसरात आज रविवारी सकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अशरफ तांबे यांच्या घरातील किचनच्या खिडकीची काच फोडून गोळी थेट घरात घुसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रविवारी, दिनांक २९ जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आलेल्या गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक घाबरून घराबाहेर आले. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, पलीकडील शेतमळा आणि झाडझुडपांनी व्यापलेल्या भागातून ही गोळी झाडण्यात आली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिकार करण्याच्या उद्देशाने गोळी झाडली असावी, असा अंदाज ही व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मेंगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून गोळी कुणी व का झाडली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या अशा प्रकारे गोळीबार होणे, ती थेट घरात घुसणे हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.