(चिपळूण /प्रतिनिधी)
शहरातील मार्कडी परिसरातील वन विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ रेखाटून रंगरंगोटी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शासकीय मालमत्तेचा कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी अथवा प्रतीकात्मक वापरासाठी उपयोग होऊ नये, असा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तीव्र आक्षेप नोंदविला आहे.
काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी यासंदर्भात निवेदन सादर करत संबंधित चिन्ह तत्काळ हटविण्याची मागणी केली. शासकीय संपत्तीवर पक्षीय प्रतिके उमटविणे नियमबाह्य असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. काही दिवसांपूर्वी पेठमाप येथील विकासकामाच्या भूमिपूजन फलकावर भाजप जिल्हाध्यक्षांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. त्या प्रकरणाची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता वन विभागाच्या भिंतीवरील कमळ चिन्हामुळे नव्या राजकीय वादाची भर पडली आहे.
मार्कडी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर भाजप कार्यकर्त्यांनी पक्षचिन्ह रेखाटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने अधिकच लक्ष वेधले. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक व गटनेते साजिद सरगुरोह, नगरसेविका सफा गोटे आणि सुरेश पाथरे यांनी वन अधिकाऱ्यांची भेट घेत या प्रकाराबाबत जाब विचारला. जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी पदाधिकाऱ्यांसह वन विभागाच्या कार्यालयात धडक देत निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, सार्वजनिक आणि शासकीय मालमत्ता ही सर्वसामान्यांची असून तिचा पक्षीय प्रचारासाठी वापर होणे लोकशाही संकेतांना धरून नाही. तसेच हा प्रकार निवडणूक आचारसंहितेच्या मूलभूत तत्त्वांनाही बाधक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. शहरात या घटनेची चर्चा रंगली असून पुढील प्रशासनिक पावले काय उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे.

