(चिपळूण)
चिपळूण पंचायत समिती निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून गटनेतेपदाची घोषणा करण्यात आली आहे. आज पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड बैठकीत सूर्यकांत खेतले यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली. मात्र सत्ता कोणासोबत स्थापन करायची, याबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने चिपळूणमधील सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम आहे.
निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्याने पंचायत समितीवर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. एकूण १८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सर्वाधिक ७ जागांसह अग्रस्थानी आहे. यानंतर शिवसेना ४, भाजप ३ आणि ठाकरे गटाला ४ जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी किमान १० सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.
निकालानंतर आमदार शेखर निकम यांनी सभापतीपदासाठी पाठिंबा देणाऱ्या पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर पाग हायस्कूल येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याच बैठकीत पंचायत समितीसाठी गटनेतेपदी सूर्यकांत खेतले यांची निवड करण्यात आली.
खेतले यांनी यापूर्वी उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली असून ते पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकारी मानले जातात. सामाजिक क्षेत्रातील त्यांचा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांना गटनेतेपदाची संधी देण्यात आल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र बैठकीत सत्ता स्थापनेबाबत कोणतीही सखोल चर्चा न झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. सभापती निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही बैठकीत नमूद झाले. सुरुवातीला राष्ट्रवादीकडून ठाकरे गटासोबत सत्ता स्थापनेचा कल असल्याचे बोलले जात होते. मात्र जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू नयेत, यासाठी गुप्त हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
या बैठकीला आमदार शेखर निकम यांच्यासह शौकतभाई मुकादम, जयंद्रथ खताते, दादा साळवी, रमेश राणे, अशोक कदम, पांडुरंग माळी, नितीन ठसाळे, दिशा दाभोळकर, नवनिर्वाचित सदस्य शौकत माखजनकर, शरद शिगवण, संजय कदम, मेघा इंगावले, स्नेहा साळवी, मनस्वी बैकर, मयूर खेतले, स्वप्नील शिंदे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
चिपळूण पंचायत समितीवर अखेर सत्ता कोण स्थापन करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

