(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील अनिकेत नरेश काळोखे यांना 64 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार या विभागातील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमीवरील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि दर्जेदार कामगिरीची ही राज्यस्तरीय दखल मानली जात असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मूळचे देवळे गावचे असलेले अनिकेत काळोखे सध्या मुंबई येथे नाटक, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट आणि शॉर्ट फिल्म्ससाठी व्यावसायिक रंगभूषाकार (मेकअप आर्टिस्ट) म्हणून कार्यरत आहेत. रंगभूषा क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीतून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सन 2008 पासून त्यांनी रंगभूषेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. किशोर पिंगळे आणि मनोज शेटे यांच्याकडून रंगभूषेची प्राथमिक तालीम घेतल्यानंतर त्यांनी मराठी नाटक, गुजराती मालिका तसेच विविध व्यावसायिक प्रकल्पांमध्ये काम केले. राजेश परब यांच्यासोबत ‘जिम पोरी जिम’, ‘लग्न बंबाळ’, ‘इच्छा माझी पुरी करा’ यांसारख्या व्यावसायिक मराठी नाटकांमध्ये त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केले.
दत्ता भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक रंगभूषेचे विशेष कौशल्य आत्मसात करताना ‘शंभूराजे’ आणि ‘शिवपुत्र शंभूराजे’ या भव्य नाट्यप्रयोगांमध्येही काम करण्याची संधी त्यांना मिळाली. याशिवाय ‘अजंठा’ हा मराठी चित्रपट, ‘इन्कार’ हा हिंदी चित्रपट, ‘कट्टी बट्टी’ मालिका तसेच अनेक शॉर्ट फिल्म्स आणि एकांकिकांमध्येही त्यांनी रंगभूषेची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे त्यांचे स्वतंत्र रंगभूषाकार म्हणून पहिले नाटक ठरले. त्यानंतर बालनाट्य राज्य नाट्य स्पर्धा आणि महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 2013-14 मध्ये ‘शोध बाई शोध’, 2015 मध्ये ‘हनुमान’ बालनाट्य, 2017 मध्ये ‘घोळात घोळ’ या व्यावसायिक नाटकासाठी गंधार पुरस्कार, 2019 मध्ये ‘नवा सूर्य’ आणि 2026 मध्ये ‘अडलंय काय’ या बालनाट्यासाठी उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
“रंगभूषेच्या या प्रवासामुळे वेळेचे नियोजन, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व शिकायला मिळाले,” असे अनिकेत काळोखे यांनी सांगितले. त्यांच्या या राज्यस्तरीय यशाबद्दल देवळे गावासह संगमेश्वर तालुका आणि परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

