(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने आपल्या संघटनात्मक बांधणीला धार देत अजय बिरवटकर यांची जिल्हा परिषद गटनेतेपदी एकमताने निवड केली आहे. या निवडीमुळे पक्षाच्या स्थानिक राजकारणातील हालचालींना नवे परिमाण लाभणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
बिरवटकर हे पक्षातील संघटनात्मक शिस्त आणि रणनीतीसाठी ओळखले जातात. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेव्हणे असून, खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गटातून त्यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराचा पराभव करत त्यांनी आपल्या राजकीय ताकदीची ठोस नोंद केली. या विजयामुळे पक्षांतर्गत त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने खेड, दापोली आणि चिपळूण या पट्ट्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. महायुतीतील घटक पक्ष असूनही या भागात स्वतंत्र भूमिका घेत पक्षाने उमेदवार रिंगणात उतरवले. या धोरणाचा परिणाम म्हणून पक्षाचे पाच सदस्य निवडून आले असून, सत्तासमीकरणांमध्ये या पाच सदस्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात असले तरी जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी व्हायचे की विरोधी बाकांवर बसायचे, याचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर न घेता वरिष्ठ नेतृत्वाकडूनच घेतला जाणार असल्याचे पक्षस्तरावर स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत जिल्हा परिषदेत नवे समीकरण आकाराला येण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले असून, बिरवटकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कोणती भूमिका घेते, यावर पुढील सत्तासमीकरणांची दिशा अवलंबून राहणार आहे.

