(कळझोंडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावातील प्रलंबित राहिलेली विकासकामे सातत्याने पाठपुरावा करूनही तसेच निवेदन देऊनही मार्गे लागत नसल्याने कळझोंडीवासीय आता एकवटले असून कानाडोळा करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा थेट इशारा कळझोंडी जनआंदोलन समितीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते महादेव आग्रे, युवा नेतृत्व संदीप पवार, पांडुरंग सनगरे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विभाग रत्नागिरी. कळझोंडी गावातील फाटा क्रमांक २ ते कळझोंडी फाटा क्र. १ हा रस्ता एम.आय.डी.सी. सेस फंडातून मंजूर असून या रस्त्यावर माहे एप्रिल २०२५ या कालावधीत खडी टाकून ठेवण्यात आली असून अद्याप डांबरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. याबाबत निवेदन देऊन तसेच अनेकदा पाठपुरावा करूनही सदरचे काम दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. या रस्त्याला प्रचंड खड्डे पडले असून येथील वाहतुकीला फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील विद्यार्थी, ग्रामस्थ, प्रवासी यांच्यावतीने दुर्लक्षित कामाबद्दल आवाज उठत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, रत्नागिरी कळझोंडी येथील धरणाची उंची वाढविणे, जॅकेटिंग व ग्राऊटिंग करणे, नवीन रस्ता तयार करणे व डांबरीकरण करणे अशी विस्तारित कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग रत्नागिरी यांच्या अधिपत्याखाली पूर्ण झाली असून कळझोंडी धरण ते तिसंग मार्ग शिंदेवाडी व आग्रेवाडी या रस्त्याची ही कामे पूर्ण झालेली आहे. परंतु मागील पावसाळी कालावधीत कळझोंडी धरण ते तिसंग मार्ग रस्त्याची दुर्दशा झाली असून या भागातील रस्त्याची साईट पट्टी धरणाच्या पाण्यात घसरून हा रस्ता मृत्यूला आमंत्रण देणारा ठरला असून या रस्त्यावर अपघात उद्भवल्यास मानव व वित्तहानी होऊ शकते अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार जीवन प्राधिकरण विभाग रत्नागिरी यांच्याकडे या रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु सदरचे काम अद्याप कार्यान्वित झाले नसून सदरचे काम येत्या १० दिवसात मार्गी लावण्यात यावे. अन्यथा येथील जन आंदोलन समितीचे जनआंदोलनाचे नियोजन पक्के होत असल्याचे चित्र आहे. शिवाय येथील कळझोंडी धरणाचे काम पूर्ण झाले असून येथील नवीन पाण्याची टाकी, नवीन पाईपलाईन, नवीन जॅकवेल नवीन पंप पाऊस सद्यस्थितीत चालू नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रादेशिक नळ पाणी योजनेला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.
तरी सदर नवीन योजना लवकरच चालू करण्यात यावी, अशी मागणी जन आंदोलन समितीने कार्यकारी, अभियंता जीवन प्राधिकरण विभाग रत्नागिरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. महाप्रबंधक दूरसंचार विभाग रत्नागिरी यांचे वरिष्ठ कार्यालयीन सहाय्यक रत्नागिरी कळझोंडी गावातील बौद्धवाडी नजीकच बी.एस.एन.एल. टॉवर बांधण्यात आलेला आहे. सदर टॉवरच्या सेवेत सातत्याने बिघाड होत असल्याने येथील नागरिक, उद्योजक, व्यापारी, शासकीय कार्यालय यांना आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये अडथळे निर्माण होत आहे. येथील ग्रामस्थांनी सदर टॉवर यंत्रणेतील बिघाडामुळे तीव्र नाराजी दर्शविली आहे. १० दिवसांत सुधारणा न झाल्यास गावातील ग्रामस्थांच्यावतीने जन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रत्नागिरी कळझोंडी फाटा क्र.१ येथील रस्त्याच्या मोरीला सुमारे दोन फुटाचे घबदार पडले असून एस.टी. वाहतूक सध्या रस्त्याच्या बाहेरील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या रस्त्यावर साईट पट्ट्या व खड्ड्यांमुळे येथील वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे .या मार्गावरून जाताना गावातील ग्रामस्थ विद्यार्थी प्रवासी पर्यटक यांच्या जीवित फार मोठा धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत वरील कार्यालयाला वेळोवेळी कळवूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. उप अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) जि.प.उपविभाग, रत्नागिरी, कळझोंडी धरणाचे विस्तारित बांधकाम व पाईपलाईन, जॅकवेल, पाण्याची टाकी सदरची कामे पूर्ण झाली असून सदर नवीन योजना का चालू करण्यात आली नाही, याबाबत माहिती उपलब्ध व्हावी. येत्या आठ दिवसांत सदर पाणीपुरवठा योजना नवीन लाईनने सुरू करण्यात यावी. कळझोंडी ग्रामस्थ जन आंदोलनाच्या तयारीला लागले असून गावातील ग्रामस्थ व्यापक धरणे जनआंदोलन उभारून शासन प्रशासनाला जाब विचारतील याबाबतचे निवेदन उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग रत्नागिरी यांना दिले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी आगारातून सुटणारी दु.१ वाजता कळझोंडी मार्गे खंडाळा एस.टी.बस ही अनियमित असून ती कधी अचानक बंद करण्यात येते. त्यामुळे येथील ग्रामस्थ, नागरिक, प्रवासी, पर्यटक यांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो. सदर एस.टी. बस नियमित सुरू करण्यात यावी. सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी आगारातून सुटणारी रत्नागिरी कळझोंडी मार्गे वरवडे, रीळ, जयगड ही एस.टी. बसही गावातून न सांगता बंद केली असून या कालावधीला २ वर्षे लोटली तरी सदरची एस टी सेवा पूर्ववत झाली नाही. बस पूर्ववत करावी अशी मागणी कळझोंडी जनांदोलन समितीने रत्नागिरी आगार प्रमुख यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. येत्या १० दिवसांत सदर एस.टी. वाहतूक नियमित वेळेवर पूर्ववत सुरू ठेवण्यात आली नाही. तर कळझोंडीवासिय ग्रामस्थ जनआंदोलन समितीच्यावतीने व्यापक धरणे जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

