(रत्नागिरी)
एकत्र दारूच्या मैफलीत रमल्यानंतर कामाशी संबंधित किरकोळ वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन दोघांनी आपल्या सहकाऱ्याला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कळझोंडी फाटा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार २९ जून २०२५ रोजी सायंकाळी घडला. अनिल चव्हाण आणि सुनील पवार (दोघेही रा. विजापूर, कर्नाटक) अशी संशयितांची नावे असून अशोक धनसिंग पवार (वय ४०, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. वाटद खंडाळा, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही घटना उघड झाली.
कामानिमित्त तिघे संगमेश्वर येथे गेले होते. परतताना त्यांनी जाकादेवी येथील एका बारमध्ये दारूचे सेवन केले. याच दरम्यान कामाशी निगडित वादाला ऊत आला. त्यानंतर फिर्यादी हे दुचाकीने घरी परतत असताना लघुशंकेसाठी थांबले असता संशयितांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. भांडणाचा राग मनात धरून दोघांनी फिर्यादीला चापट–लाथांनी मारहाण केली. जमिनीवर कोसळल्यानंतरही त्याला कोणाला काही बोलल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली. शिवाय डोक्यात दगड घालून गंभीर दुखापतीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (३), ३५२ व ३ (५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

