( मुंबई )
भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील संघटनात्मक रचनेत महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रशांत यादव यांची रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे.
रत्नागिरी दक्षिण भागात भाजप संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्रशांत यादव यांनी यापूर्वी नगर परिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष संघटन मजबूत ठेवत प्रभावी नियोजन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण व संगमेश्वर परिसरात भाजपला उल्लेखनीय यश मिळाले आहे.
बूथस्तरावरील संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवणे आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे या कार्यपद्धतीमुळे त्यांनी पक्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याचे दिसत आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढविणे ही प्रमुख उद्दिष्टे प्रशांत यादव यांच्यासमोर असणार आहेत.
नियुक्ती जाहीर होताच चिपळूणसह रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून प्रशांत यादव यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजप अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

