(मुंबई)
‘कांटा लगा’ या गाजलेल्या म्युझिक व्हिडिओतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे. वयाच्या ४२व्या वर्षी शेफालीने मुंबईत अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे तिचं निधन झाल्याची माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. गुरुवारी उशिरा रात्री शेफालीला अचानक छातीत दुखू लागल्यामुळे तिच्या पतीने – अभिनेते पराग त्यागी यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी दाखल होताच तिला मृत घोषित केलं. या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून, प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘कांटा लगा’नं मिळवली होती रातोरात प्रसिद्धी
2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यामुळे शेफाली जरीवालाचं नाव संपूर्ण देशात गाजलं. तिच्या बोल्ड लूक आणि प्रभावी डान्स स्टाईलमुळे ती एका रात्रीत लोकप्रियतााच्या शिखरावर पोहोचली. हे गाणं मूळतः 1964 सालच्या ‘समझौता’ चित्रपटातील लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन होतं, ज्याला कल्याणजी-आनंदजी यांनी संगीत दिलं होतं.
टीव्हीवरील यश आणि ‘बिग बॉस’मधील कामगिरी
शेफाली जरीवालाने केवळ म्युझिक व्हिडिओपुरतीच आपली ओळख सीमित ठेवली नाही. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये आणि प्रोजेक्ट्समध्ये काम करत अभिनयाची चुणूक दाखवली. तिची आणखी एक ओळख म्हणजे बिग बॉस सीझन १३ मधील तिचं लक्षवेधी आणि संयमी वर्तन – ज्यामुळे ती प्रेक्षकांच्या आणखी जवळ गेली होती.
शेफालीच्या निधनानंतर तिच्या पती पराग त्यागी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी, सहकलाकारांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तिचा सौंदर्य, डान्स, आणि व्यक्तिमत्त्व यामुळे शेफाली जरीवालाने आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. तिची आठवण कायम राहील. ‘कांटा लगा’मुळे चर्चेत आलेली शेफाली, तिच्या कारकिर्दीत कायमच प्रेरणादायी आत्मविश्वास आणि सौंदर्याचा मिलाफ होती. मनोरंजन विश्वात तिचं योगदान कायम लक्षात राहील. तिच्या अचानक निधनाने चाहत्यांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.