(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील आठवडा बाजार परिसरातील बेघर निवारा केंद्रात वास्तव्यास असलेल्या सीमा शांताराम खाके (वय ५२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.१९ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमा खाके यांना १ डिसेंबर २०२५ रोजी श्रीकांत भिडे यांनी आठवडा बाजार परिसरातील बेघर निवारा केंद्रात दाखल केले होते. त्या तेथे वास्तव्यास होत्या. दरम्यान, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सिद्धेश भिडे यांनी उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयातील महिला जनरल वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१९ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. हस्नेन अब्बाज रिजवी यांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १४४/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०३ वाजता ही नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करणारी माहिती पोलीस नोंदीत नमूद नाही.


