(रत्नागिरी / लांजा)
लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द-कातळवाडी येथे घराची कौले काढून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने वृद्ध महिलेचे सुमारे ७ लाख ८७ हजार ८७७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरात नम्रता हेमंत लाड (६३) या झोपलेल्या असताना चोरट्याने ही घरफोडी केली. या प्रकरणी त्यांचे पुत्र अभिजित हेमंत लाड (३९) यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेरवली खुर्द-कातळवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या नम्रता लाड या रात्री घरात झोपलेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराची कौले काढून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. चोरीस गेलेल्या ऐवजात दोन तोळे वजनाच्या जुन्या वापरत्या सोन्याच्या रिंगा (कानातील), पाच तोळे वजनाच्या दोन पाटल्या, अडीच तोळे वजनाच्या चार बांगड्या, साडेतीन तोळे वजनाची गोफमाळ आणि अंदाजे अडीच ग्रॅम वजनाची हिऱ्याची अंगठी यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत ७ लाख ८७ हजार ८७७ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अभिजित लाड हे सध्या मुंबईतील प्रभादेवी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या आईच्या घरात झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घराची कौले काढून चोरट्याने प्रवेश केल्याने घराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५ (क) आणि ३३१ (४) अन्वये लांजा पोलीस ठाण्यात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत ७ लाख ८७ हजार ८७७ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


