(राजापूर / रत्नागिरी)
मानसिक त्रासातून स्वतःच्या अंगावरील कपड्यांना आग लावून घेतलेल्या राजापूर तालुक्यातील ससाळे येथील मयूरी मिलिंद तांबे (वय ४६) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना २ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.०५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूरी तांबे यांना मानसिक त्रास असल्याने त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील साईरूप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास ससाळे येथील राहत्या घराच्या अंगणात त्यांनी माचिसच्या काडीने स्वतःच्या अंगावरील कपड्यांना आग लावून घेतली. या घटनेत त्या मानेपासून पायापर्यंत गंभीररीत्या भाजल्या. या घटनेनंतर त्यांना प्रथम राजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी त्यांना अधिक उपचारांसाठी मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वॉर्ड क्रमांक १६ (ए) मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, २ ऑक्टोबर रोजी रात्री ८.०५ वाजता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची सुरुवातीला मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३२२/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली होती. त्यासंदर्भातील कागदपत्रे २३ ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आली आणि ती २७ ऑक्टोबर रोजी राजापूर पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. मृत महिलेचा फोटो नंतर प्राप्त झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.१४ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६८/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. मयूरी मिलिंद तांबे या राजापूर तालुक्यातील ससाळे येथील बौद्धवाडीतील रहिवासी होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


