(रत्नागिरी/ खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील पटवर्धन लोटे येथील एचपी पेट्रोलपंपासमोरील पुलावर भरधाव कारने धडक दिल्याने ५५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. शांतावा निंगाप्पा वालीकर असे जखमी महिलेचे नाव आहे. महामार्गावरील पूल ओलांडताना चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या मारुती एर्टिगा कारने त्यांना धडक दिली. याप्रकरणी कारचालक अशफाक इस्माईल मोगल (६४, रा. एस.टी. कॉलनी, हिरा अपार्टमेंट, रत्नागिरी) याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चंदाप्पा क्येमर्या पुजारी (५४) हे त्यांच्यासोबत काम करणारे कामगार निंगापा सोमलिंगप्पा वालीकर आणि त्यांची पत्नी शांतावा यांच्यासह कामावरून घरी पायी जात होते. पटवर्धन लोटे येथील एचपी पेट्रोलपंपासमोरील पुलावर आल्यानंतर ते रस्ता ओलांडत होते. यावेळी शांतावा या इतरांच्या पुढे चालत असताना चिपळूणच्या दिशेने येणाऱ्या मारुती एर्टिगा कारने त्यांना धडक दिली.
संशयित आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने, निष्काळजीपणे आणि हयगयीने चालविल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या धडकेत शांतावा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीराच्या अन्य भागांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणी अशफाक इस्माईल मोगल याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.


