सामंथा रुथ प्रभूच्या नाव, फोटो आणि आवाजाच्या गैरवापरावर हायकोर्टाचा दणका
मुंबई : दक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूला व्यक्तिमत्व स्वामित्व हक्काच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सामंथाच्या पूर्वपरवानगीशिवाय तिचे नाव, छायाचित्रे आणि आवाज वापरून विविध प्रकारचा कंटेंट तयार केल्याप्रकरणी तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आक्षेपार्ह सामग्री हटवण्याचे आदेश गुरुवारी सर्व प्रतिवाद्यांना दिले. या प्रकरणात मेटा, गुगल, ॲमेझॉन, विविध एआय प्लॅटफॉर्म आणि डिजिटल मीडिया संस्थांसह एकूण 18 जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
मॉर्फ्ड छायाचित्रे, डीपफेक व्हिडिओ, एआयच्या माध्यमातून तयार केलेला आवाज, अश्लील व्हिडिओ तसेच अभिनेत्रीचे वस्तुकरण करणारे एआय चॅटबॉट्स यांचा वापर होत असल्याचा मुद्दा सामंथा प्रभूने याचिकेत उपस्थित केला आहे. वकील रश्मीन खांडेकर यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली.
या प्रकारच्या सामग्रीमुळे प्रथमदर्शनी सामंथाच्या व्यक्तिमत्त्व, प्रसिद्धी आणि नैतिक हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)(a) अंतर्गत असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच कलम 21 अंतर्गत जीवन, व्यक्तिगत स्वातंत्र्य, गोपनीयता आणि मानवी प्रतिष्ठेचा अधिकार सामंथाच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी हक्कांचे संरक्षण करतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार संबंधित सर्व आक्षेपार्ह सामग्री तत्काळ हटवण्याचे आदेश हायकोर्टाने संबंधित प्रतिवाद्यांना दिले.
गेल्या काही काळात एआयच्या माध्यमातून तयार होणाऱ्या डीपफेक आणि अन्य सामग्रीमुळे अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासाठी तसेच प्रसिद्धी हक्कांच्या मुद्यावर न्यायालयात धाव घेतली आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय, ऋतिक रोशन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, आशा भोसले, सुनील शेट्टी, कार्तिक आर्यन आणि इतर सेलिब्रिटींचा त्यामध्ये समावेश आहे.


