(रत्नागिरी / प्रतिनिधी)
“बेटी बचाओ, बेटी पढाओ”चा संदेश न्यायालयाने पुन्हा अधोरेखित करत मुलींबाबत समाजातील आस्थेचा दृष्टिकोन बदलण्याची कडक गरज असल्याचे स्पष्ट केले. एक महिन्याच्या बालिकेच्या खुनाच्या प्रकरणात स्वतःचीच मुलगी ठार करणाऱ्या मातेला चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 25 ऑगस्ट रोजी जन्मठेप व २५ हजारांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला आणखी दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा होणार आहे. हा ऐतिहासिक निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी दिला.
चिपळूण मधील वहाळ (घडशीवाडी) येथील वास्तव्यास असलेली आरोपी शिल्पा प्रवीण खापले ही दोन लहान मुलींसह नवरा व सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. दोन मुली असूनही मुलगा होण्याची तीव्र इच्छा अपूर्ण राहिल्याने ती संतप्त झाली होती. ५ मार्च २०२१ रोजी तिचे पती रत्नागिरीला गेले असताना आरोपीने आपल्या केवळ एक महिन्याच्या मुलीला पाण्याने भरलेल्या बादलीत डोके खाली करून बुडवून ठार मारले. त्यानंतर तिने शेजाऱ्यांसमोर बेशुद्ध पडल्याचे नाटक करून “मी नव्हेच” असा बेबनाव केला.
सुरुवातीला सावर्डे पोलीस ठाण्यात आस्कमिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती. परंतु घटनास्थळ, पार्श्वभूमी आणि परिस्थिती पाहता हा खूनच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सुरुवातीला अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक सचिन बारी यांनी सखोल तपास करत आरोपी आईनेच हा गुन्हा केल्याचे सिद्ध केले आणि तिच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे ॲड. अनुपमा ठाकूर यांनी खटल्याची मांडणी करत आरोपीविरुद्ध ठोस युक्तिवाद केला. वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शेजारी अशा तब्बल १५ साक्षीदारांच्या साक्षींमुळे आरोपीचे दुष्कृत्य न्यायालयासमोर स्पष्ट झाले. याशिवाय सर्वोच्च व उच्च न्यायालयातील निर्णयांचा दाखला देत सरकार पक्षाने ठोस पुरावे मांडले.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्रीनेच बाळाचा खून करणे हे अत्यंत गंभीर व अमानुष आहे. त्यामुळे समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी आरोपी महिलेस कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे. संविधानाने बालिकांना दिलेल्या घटनात्मक हक्कांचा आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेचा उल्लेख करून न्यायालयाने समाजाला जागृतीचा चपराक दिला. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड. अनुपमा ठाकूर यांनी भूमिका पार पाडली. पोलीस उपअधीक्षक सचिन बारी यांनी कसून तपास केला, तर कोर्ट पैरवी पोलीस कॉन्स्टेबल श्री. कांबळे यांनी काम पाहिले.

