( रत्नागिरी /प्रतिनिधी )
शहरातील रस्ते खड्ड्यांनी विद्रूप झालेले असताना, याच परिस्थितीचा फायदा आता ट्रॅफिक पोलिस घेत असल्याचे चित्र समोर येत आहे. खड्ड्यांतून गाड्या सावकाश काढणाऱ्या वाहनचालकांना साळवी स्टॉप, जे के फाइल, जेल रोड अशा मोजक्या रहदारीच्या परिसरात थांबवून ट्रॅफिक पोलिसांकडून दंड वसुलीचा उफराटा प्रकार सुरू आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत असून, पोलिसांचा हा अरेरावीचा कारभार नागरिकांच्या रोषास कारणीभूत ठरत आहे.
साळवी स्टॉपजवळ खड्ड्यांच्या पुढेच पोलिसांनी आपली जणूकाही “दंडवसुलीची चौकी” उभारल्याचे चित्र दररोज पाहावयास मिळते. वाहनचालकांना किरकोळ कारणावरून बाजूला घेऊन दंड ठोकला जात आहे. यासोबत आता तर एमआयडीसी परिसरातील आतील रस्त्यांवरही ट्रॅफिक पोलिस वळणाच्या ठिकाणी आडोशाला लपून राहून दुचाकीचालक समोर येताच अचानक रस्त्यावर येऊन दुचाकीचालकांना थांबवतात. अशा पध्दतीने वाहनचालकांकडून दंड वसुलीचा हा प्रकार म्हणजे थेट त्रासाचे मूळ ठरले आहे. दोन वर्षांपूर्वी ट्रॅफिक पोलिसांच्या त्रासाबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालून हेल्मेट सक्तीचा निर्णय रद्द करून लोकहिताचा निर्णय घेतला होता. मात्र आता पुन्हा त्याच जुन्या पद्धतीने पोलिस नागरिकांना अडवून दंडवसुली सुरू केल्याने जनतेत प्रचंड नाराजी निर्माण होत असल्याचे चित्र आहे. खड्ड्यांनी विद्रूप झालेले शहर, आणि दंडवसुलीत रमलेले ट्रॅफिक पोलिस यांच्यांमधून नागरिकांचा त्रास कधी संपणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
दररोज गावखेड्यांमधून शहरात कामानिमित्त येणारे लोक दिवसाचे तीनशे-पाचशे रुपये कमावतात. पण ट्रॅफिक पोलिसांच्या या नाहक दंडामुळे त्यांचा दिवसाचा मेहनताना अक्षरशः हडप केला जातो. एखाद्या झाडाच्या आडोशाला उभे राहून अचानक गाड्या अडवण्याचा प्रकार म्हणजे थेट नागरिकांना जाळ्यात ओढण्यासारखेच आहे. नामांकित गद्रे कंपनीच्या वळणावर झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलिसांच्या टोळीकडून दिनांक ४ ऑक्टोबर रोजी अगदी संध्याकाळच्या सुमारास ( नागरिक काम-धंदा करून घरी जात असताना) वाहनचालकांना अशाच प्रकारे अडवणूक करून दंड वसुली करण्याचा प्रकार सुरू होता. अशा प्रकारे नागरिकांना त्रास देणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने चौकशी करून जबाबदार पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
…तिथे पोलिसांची सावलीसुद्धा दिसत नाही!
शहरात खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होत असताना, ती सोडवणे हे ट्रॅफिक पोलिसांचे मुख्य काम आहे. मात्र प्रत्यक्षात जिथे वाहतूक कोंडी होते, तिथे पोलिसांची सावलीसुद्धा दिसत नाही! उलट दंडवसुलीच्या मोहिमेसाठी पोलिस आता MIDC मधील आतील रस्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ट्रॅफिक नियंत्रणाचा अभाव आणि दुचाकीचालकांच्या अडवणुकीवर झालेला भर यामुळे नागरिकांचा संताप आता ओसंडून वाहत आहे. रस्ते सुधारून द्या, ट्रॅफिक सुरळीत करा, मग दंड वसूल करा! अशी थेट मागणी आता वाहनचालकांकडून केली जात आहे.

