(रत्नागिरी)
जांभळं काढण्यासाठी झाडावर चढलेला एक तरुण खाली पडून गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे मधलावठार येथे घडली.
दीपक विलास पवार (वय २७), हा तरुण कोळंबे गावातील प्रवीण अनंत दामले यांच्याकडे मजूरीचे काम करत होता. १५ मे रोजी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास तो खांबाच्या मळ्यात जांभळं काढण्यासाठी झाडावर चढला होता. मात्र तोल गेल्याने दीपक झाडावरून खाली पडला आणि गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर गावकऱ्यांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना, मंगळवारी २० मे रोजी त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अचानक झालेल्या या मृत्यूमुळे कोळंबे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात दुर्दैवाने घडलेला मृत्यू कुटुंबावर शोककळा पसरवून गेला आहे.