(पुणे)
शासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत वैयक्तिक समारंभ, विशेषतः वाढदिवस साजरे करणे ही शिस्तभंगाची बाब मानली जाणार असून, अशा प्रकारांवर आता कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ. सुहास दिवसे (भा.प्र.से.) यांनी एक स्पष्ट परिपत्रक जारी केले आहे.
अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत वाढदिवस अथवा इतर वैयक्तिक समारंभ साजरे करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवळ कामकाजाचा व्यत्यय येतोच, पण कार्यालयात आलेल्या नागरिकांनाही ताटकळत राहावे लागते. परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या कृतीमुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे उल्लंघन होत असून, यास शिस्तभंगाचे प्रकरण म्हणून पाहिले जाणार आहे.
आदेशाचे मुख्य मुद्दे:
- शासकीय कार्यालयात आणि कार्यालयीन वेळेत कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक समारंभ, विशेषतः वाढदिवस, साजरा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
- अशा घटना निदर्शनास आल्यास नियंत्रण अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना समज द्यावी.
- भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेशही यामध्ये देण्यात आले आहेत.
हे आदेश फक्त भूमी अभिलेख विभागापुरते मर्यादित नसून, संपूर्ण राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर लागू होणार आहेत.