(पोलादपूर / शैलेश पालकर)
पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामामुळे रस्त्याची दूर्दशा झाली असून प्रतापगड दर्शनानंतर महाबळेश्वरकडे जाणारी सहलीची बस आंबेनळी घाटात रस्त्यालगतच्या चरामध्ये कलंडल्याची घटना झाली. या अपघातात दरीच्या बाजूऐवजी रस्त्यालगत डोंगराच्या बाजूच्या चरामध्ये सहलीची बस कलंडल्याने मोठा जीवघेणा अपघात टळला आहे.
समर्थ ट्रॅव्हल्सची खासगी रामेश्वर आरामबस (एमएच 47 वाय 7992) ही सहलीच्या विद्यार्थ्यांना घेऊन प्रतापगड दर्शनानंतर महाबळेश्वरकडे निघाली असताना आंबेनळी घाटात या आरामबसचा टायर रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या चरात अडकल्याने बसचा पुढील टायर अधांतरी राहिला. या प्रकारामुळे आरामबसमधील विद्यार्थी व शिक्षक तसेच बसचे कर्मचारी यांच्या किंचाळयांनी परीसरामध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या अपघातात विद्यार्थी, शिक्षक व चालक यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या अपघातामुळे आंबेनळी घाटामध्ये काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला आणि ही अपघातग्रस्त आरामबस काही वेळानंतर क्रेनच्या सहाय्याने बस चरातून बाहेर काढेपर्यंत अनेक वाहनचालकांना या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून मनस्ताप झाला.
अपघाताच्या ठिकाणी आंबेनळी घाटातील तीव्र वळणाचा योग्य अंदाज न आल्याने बस रस्त्याच्या कडेला घसरत ठेकेदारांनी रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खणलेल्या चरांमध्ये अडकली. आरामबसचा टायर चरामध्ये अडकल्याचे समजताच स्थानिक नागरिक, अडकलेले वाहनचालक आणि दुचाकीस्वारांनी तात्काळ मदतकार्य करत विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले.
आंबेनळी घाटातील रस्ता अरुंद असून तीव्र वळणांमुळे अपघातानंतर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंबेनळी घाटाच्या रूंदीकरणामुळे रस्त्याची परिस्थिती संबंधित ठेकेदारांकडून अधिकच बिकट करून ठेवण्यात आल्याने भविष्यात मोठया अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा घटनास्थळी होती.

