(अहिल्यानगर)
अहिल्यानगरमधील सिताराम सारडा विद्यालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दहावीतील विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटना अहिल्यानगरमधील बागपट्टी परिसरातील सिताराम सारडा विद्यालयात घडली. शाळेच्या सुट्टीत आठवीच्या वर्गातील वसीम या विद्यार्थ्याने दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मोहम्मद या विद्यार्थ्याच्या कानामागे चाकूने वार केला. हल्ल्यानंतर शिक्षक अमोल कदम यांनी तत्काळ मोहम्मदला रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि अखेर हिंसक हल्ल्यात. आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
मोहम्मद आणि वसीम हे दोघेही सर्जेपुरा परिसरातील रहिवासी असून त्यांची घरं अगदी जवळ आहेत. घरच्यांमध्ये कोणताही वाद नव्हता, मात्र व्यक्तिगत पातळीवर दोघांमध्ये मतभेद होते. या दुर्दैवी घटनेनंतर शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.

