( मुंबई )
मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ संकलक आणि अभिनेत्री अलका कुबल यांचे मोठे भाऊ वसंत कुबल यांचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांना पक्षाघाताचा त्रास होत होता. मुंबईतील राहत्या घरी उपचार सुरू असतानाच शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
वसंत कुबल हे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत कुशल आणि संवेदनशील संकलक म्हणून ओळखले जात. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी संपादन क्षेत्रात काम केले. ‘कुंकू लावते माहेरचे’, ‘परीस’, ‘चॅम्पियन्स’, ‘लढाई’, ‘माय माऊली मनुदेवी’, ‘स्नेक अँड लॅडर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या कौशल्याने कथानकाला वेग आणि जीवंतपणा दिला. त्यांचे काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे आणि त्यांची प्रशंसा केली जाते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. संकलनासारख्या तांत्रिक क्षेत्राला त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीने एक आधारस्तंभ गमावला आहे. मात्र, त्यांचे काम आणि कलात्मकतेबद्दलची निष्ठा नेहमीच प्रेक्षकांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात कायम राहील.

