(सांगली)
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा बालमित्र आणि सांगलीतील सामाजिक कार्यकर्ता, तरुण कलाकार विज्ञान माने याने प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्याविरोधात थेट सांगली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. चित्रपट निर्मितीच्या नावाखाली तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप विज्ञान माने यांनी केला आहे.
स्मृती मानधना यांच्याशी विवाह ठरून नंतर तो मोडलेला संगीतकार पलाश मुच्छल याने विश्वासात घेऊन ही फसवणूक केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे लेखी तक्रार देऊन पलाश मुच्छल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या नावाखाली गुंतवणूक
विज्ञान माने यांनी सांगितले की, “स्मृती मानधना माझी बालमैत्रीण आहे. तिच्यामुळेच पलाश मुच्छल याची ओळख झाली. पुढे आमच्यात मैत्री निर्माण झाली. तो संगीतकार असल्याने चित्रपटसृष्टीत त्याचा वावर आहे, यावर विश्वास ठेवून मी सांगलीत सुरू असलेल्या ‘नजरीया’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी गुंतवणूक केली.” पलाश मुच्छल याने प्रोड्यूसर म्हणून पैसे गुंतवण्यास सांगितले होते. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर हक्क विक्रीतून चांगला मोबदला मिळेल, असे आश्वासन दिल्याचा आरोप विज्ञान माने यांनी केला आहे.
रोख आणि ऑनलाइन व्यवहार
विज्ञान माने यांच्या म्हणण्यानुसार, शूटिंगदरम्यान स्मृती मानधना यांचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या उपस्थितीत त्यांनी 20 लाख आणि 5 लाख रुपये रोख स्वरूपात दिले. त्यानंतर वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीनेही रक्कम दिली. एकूण व्यवहार सुमारे 40 लाख रुपयांचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दीड वर्ष उलटूनही पैसे नाहीत
“दीड वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी पलाश मुच्छल याने गुंतवलेली रक्कम किंवा त्याचा कोणताही मोबदला दिलेला नाही. वारंवार मागणी करूनही तो टाळाटाळ करत आहे,” असे विज्ञान माने यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत जाऊन पलाश मुच्छल याची आणि त्याच्या आईचीही भेट घेतली होती. मात्र तरीही पैसे मिळाले नाहीत.
फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर तक्रार
या सर्व प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने सांगली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे विज्ञान माने यांनी स्पष्ट केले. पलाश मुच्छल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विद्यान माने यांनी, संगीतकार पलाश मुच्छलवर आणखीही गंभीर आरोप केले आहेत. मानेच्या दाव्यानुसार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगलीत होणार्या लग्नाच्या विधी दरम्यान पलाश एका परक्या महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडला गेला. यामुळे तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला आणि भारतीय महिला क्रिकेटपटूंनीही पलाशला दणका दिला होता, असा खुलासा माने यांनी केला आहे.
२३ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगलीमध्ये स्मृती आणि पलाश यांचे लग्न होणार होते. मात्र, त्यावेळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे लग्न पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच पलाशही आजारी असल्याचे समोर आले होते. दरम्यान, डिसेंबरमध्ये दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत लग्नाचे अधिकृतरीत्या रद्द झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता विज्ञान मानेच्या खुलाशामुळे लग्नाचे खरे कारण ‘आजारपण’ नसून पलाशचे ‘गैरवर्तन’ असल्याचे बोलले जात आहे.

