(नवी दिल्ली)
भारतीय नौदलाची ताकद लवकरच अधिक वाढणार आहे. कारण, रशियामध्ये तयार करण्यात आलेली अत्याधुनिक ‘स्टेल्थ’ युद्धनौका INS तमाल येत्या १ जुलै २०२५ रोजी अधिकृतपणे नौदलात दाखल होणार आहे. रशियातील कॅलिनिनग्राड येथील यंतार शिपयार्डमध्ये या युद्धनौकेच्या अनावरणाचा (Commissioning) समारंभ होईल. यावेळी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस अॅडमिरल संजय जे. सिंग उपस्थित राहणार आहेत.
INS तमाल : क्रिवाक श्रेणीतील आठवी, तुशील श्रेणीतील दुसरी युद्धनौका
‘INS तमाल’ ही क्रिवाक वर्गातील आठवी आणि ‘तुशील’ वर्गातील दुसरी युद्धनौका असून ती भारताच्या सागरी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. विशेष बाब म्हणजे, ही भारतात परदेशातून आयात होणारी शेवटची युद्धनौका ठरेल. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांना अधिक बळकटी मिळणार आहे.
स्टेल्थ आणि मारक क्षमतेचा संगम
INS तमाल ही एक मल्टी-रोल स्टेल्थ फ्रिगेट असून, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तिची लांबी १२५ मीटर, तर वजन सुमारे ३,९०० टन आहे. ही नौका ताशी ५५ किमीहून अधिक वेगाने प्रवास करू शकते आणि विविध सागरी मोहिमांसाठी सक्षम आहे.
‘तमाल’ हे नाव इंद्रदेवाच्या पौराणिक युद्धतलवारीवरून प्रेरित असून, तिच्या प्रचंड मारक क्षमतेचं प्रतीक आहे. या युद्धनौकेवर बसवलेली ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे समुद्रातील व जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक मारा करू शकतात.
याशिवाय, शत्रूच्या रडारपासून बचाव करण्यासाठी यामध्ये विशेष स्टेल्थ डिझाइन आहे.
स्वदेशीकरणाचा मजबूत टप्पा
INS तमालमध्ये २६% हून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश आहे, ज्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रासारख्या यंत्रणांचा समावेश आहे. हे प्रमाण पूर्वीच्या ‘तेग’ श्रेणीतील नौकांच्या तुलनेत दुप्पट आहे. या युद्धनौकेमध्ये उभ्या लाँच प्रणालीद्वारे मारा करणारी क्षेपणास्त्रे, सुधारित १०० मिमी नौदल तोफ, भारी टॉर्पेडो, तसेच पाणबुडीविरोधी रॉकेट्स आहेत. प्रगत सेन्सर सिस्टम्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, आणि एकाचवेळी हवाई, सागरी आणि पाण्याखालच्या धोक्यांना सामोरे जाण्याची क्षमता ही युद्धनौकेची खास वैशिष्ट्ये आहेत.
‘तलवार आर्म’मध्ये सामील होणारी नविन शक्ती
अनावरणानंतर INS तमाल भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्यातील ‘तलवार आर्म’मध्ये सामील होईल. या नव्या युद्धनौकेमुळे हिंद महासागरातील भारताची सामरिक उपस्थिती आणि सागरी सुरक्षा अधिक सक्षम होईल. या जहाजावरील २५० हून अधिक नौदल कर्मचाऱ्यांना रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि कॅलिनिनग्राड येथे कठीण हिवाळी परिस्थितीत कठोर प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘सर्वदा सर्वत्र विजय’ हे INS तमालचे घोषवाक्य, भारतीय नौदलाच्या प्रत्येक मोहिमेतील दृढ संकल्प, शिस्तबद्धता आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे.