(रत्नागिरी)
व्यवसाय म्हटलं की कर्ज घ्यावे लागते. स्वतःचे भागभांडवल व्यवसाय सुरू केला तरी व्यवसायवाढीसाठी कर्जाची आवश्यकता असते. बॅंका नेहमीच कर्ज देताना ग्राहकाची चारित्र्य, भांडवल व क्षमता पाहूनच कर्ज देते. आधीचे कर्ज कसे फेडले, कर्ज फेडण्यासाठी मानसिकता यांचा विचार केला जातो. १० लाखापर्यंत मुद्रा कर्ज योजना आहे. १ कोटी ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्याही कर्जयोजना आहेत. व्यवसायानुरूप त्याचा लाभ घेऊन महिला उद्योगिनींनी व्यवसायवृद्धी करावी, असे प्रतिपादन बॅंक ऑफ इंडियाचे निवृत्त विभागीय व्यवस्थापक संतोष सावंतदेसाई यांनी केले.
रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे श्रावण महोत्सवानिमित आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माळनाका येथील जयेश मंगल पार्क येथे हे प्रदर्शन शक्रवारपासून सुरू झाले. श्री. सावंतदेसाई यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उद्योजिका कोमल तावडे, उद्योजक गणेश धुरी, अॅड. राजशेखर मलुष्टे, ओंकार रहाटे, रत्नागिरी ग्राहक पेठच्या संचालिका संयोजिका प्राची शिंदे, माजी नगरसेविका सौ. शिल्पा सुर्वे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पटवर्धन, आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी कोमल तावडे म्हणाल्या की, या प्रदर्शनात मी आवर्जून सहभाग घेते. या प्रदर्शनातून चांगली जाहिरात होत असते. त्यामुळे नवनवीन ओळखी होतात, त्यातून आपल्या वस्तू विक्रीला प्रोत्साहन मिळत असते. गणेश धुरी यांनीदेखील या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल प्राची शिंदे यांचे कौतुक केले. अॅड. मलुष्टे यांनी महिला उद्योगिनींना विविध उत्पादने विक्रीसाठी शहर परिसरात अशा प्रकारची बाजारपेठ मिळावी याकरिता प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. मान्यवरांचा सत्कार प्राची शिंदे यांनी पुष्परोपटे देऊन केला. सूत्रसंचालन सौ. अनघा निकम यांनी केले. संध्या नाईक यांनी आभार मानले.
प्रदर्शनादरम्यान महिलांसाठी कार्यक्रम विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ ऑगस्टला दुपारी ३.३०- फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ३ ऑगस्टला दुपारी ३.३०- मी यशस्वी उद्योजिका मनोगत : पूजा भुते, ४ ऑगस्टला दुपारी ३.३० वाजता लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे डॉ. शुभांगी बेडेकर महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रदर्शनात विविध घरगुती उत्पादने, कोकण मेवा, खाद्य पदार्थ, इन्स्टंट फूड प्रॉडक्टस्, आयुर्वेदिक प्रॉडक्टस्, विविध ब्रँडेड वस्तू, लिनन, सिल्क, कॉटन साड्यांचे विविध प्रकार, सौंदर्य प्रसाधने, कुर्तीज्, ज्वेलरी, हॅण्डीक्राफ्ट प्रॉडक्टस्, ड्रेस मटेरिअल्स, गाऊन्स, अंडर गारमेंटस्, पर्सेस, साड्या, ड्रेस मटेरिअल, विविध प्रकारची ब्रँडेड होलसेल व रिटेल दरात अगरबत्ती, नर्सरी आकर्षक झाडे, गणपतीसाठी लागणारे पूजा, सजावटीचे साहित्य, भेळ, शेवपुरी, चाट वगैरे सर्व काही इथेच… खास आकर्षक गणपती मूर्ती उपलब्ध आहेत. प्रदर्शनाची वेळ ४ ऑगस्टपर्यंत सकाळी ११.०० ते रात्रौ ९.०० अशी आहे. जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी ग्राहक पेठच्या संचालिका प्राची शिंदे यांनी केले.