( खेड )
तालुक्यातील वेरळ रस्त्यावर भरधाव आणि राँग साइडने येणाऱ्या ट्रिपल सीट मोटारसायकलने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना २१ जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत, तर रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी रिक्षाचालक गणपत काशिराम जाधव (वय ४६, रा. कुळवंडी, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, एम.एच.०८ ए.यु. ८६३० क्रमांकाच्या दुचाकीवरील तिघेजण ट्रिपल सीट प्रवास करत असताना राँग साईडने भरधाव वेगात चालवत आले आणि त्यांनी जाधव यांच्या ताब्यातील रिक्षा (क्र. एम.एच.०८ एक्यु ७०८१) ला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे रिक्षाचे नुकसान झाले असून, दुचाकीवरील तिघे अनोळखी तरुण जखमी झाले आहेत. या अपघातास जबाबदार असलेल्या दुचाकीस्वारांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १२८(१)/१९४(सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.