( संगमेश्वर )
तालुक्यातील साखरपा (सुर्वेवाडी) परिसरात एका घरातून तब्बल १ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी संबंधित घरातीलच माय-लेकींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. २१ जून) दुपारी १ वाजता देवरुख पोलीस ठाण्यात ही नोंद करण्यात आली.
या प्रकरणी सरिता सुरेश सुर्वे यांनी तक्रार दाखल केली असून, त्यांच्या मालकीच्या घराच्या माळ्यावर पत्र्याच्या पेटीत हे दागिने ठेवले होते. चोरट्यांनी तेथे हात साफ करत ५६ हजारांचे मंगळसूत्र, २७ हजारांचे आणखी एक मंगळसूत्र, १३ हजारांचे कानातील टॉप्स, १० हजारांच्या दोन अंगठ्या आणि ४ हजारांच्या तीन अंगठ्या असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
ही चोरी १० सप्टेंबर २०२४ ते १० जून २०२५ या कालावधीत घडल्याचा अंदाज आहे. प्रकाराची माहिती मिळताच देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर आणि उपनिरीक्षक नामदेव जाधव यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सरिता सुर्वे यांच्या फिर्यादीवरून माय-लेकींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, घरातच गुन्हा घडल्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांकडून अधिक बारकाईने तपास सुरू आहे.