(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ स्टॉप परिसरात वाहनांचा वाढता वेग नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. वारंवार अपघातांचा धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायत तुरळ यांनी जिल्हाधिकारी तसेच महामार्ग प्राधिकरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे गतीरोधक (Speed Breaker) व आवश्यक सूचना फलक बसविण्याची मागणी केली आहे. मात्र, पत्रव्यवहार करूनही अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत तुरळ कार्यक्षेत्रातील तुरळ स्टॉप हा राष्ट्रीय महामार्ग ६६ लगतचा महत्त्वाचा परिसर असून, या ठिकाणाहून कडवई फाटा आणि धामापूर फाटा जोडले जातात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेक वाहने या भागातून अतिवेगाने धावत असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीने आपल्या निवेदनात हायवेवरील धोकादायक ठिकाणी नियमानुसार गतीरोधक बसविणे, तसेच वाहनचालकांना सावध करण्यासाठी सूचना फलक उभारणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर विषयावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रभावी पावले उचलण्यात आलेली नाहीत. अपघात होण्याची वाट पाहण्याऐवजी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

