( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यातील सातत्यपूर्ण सामाजिक कार्यासाठी परिचित असलेल्या ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख जमीर खलफे यांची संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
गेल्या सात वर्षांपासून खलफे हे विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरजू घटकांसाठी झटत आहेत. आपत्ती व्यवस्थापन, शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे अशा अनेक माध्यमातून ‘संपर्क युनिक फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संस्थेच्या सभासदांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत नेतृत्वाची जबाबदारी दिली.
निवडीनंतर बोलताना खलफे म्हणाले, “आपल्यावर टाकलेली जबाबदारी मी सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पार पाडीन. आजपर्यंत केलेले काम हेच माझे ओळखपत्र असून, ते अधिक व्यापक आणि परिणामकारक स्वरूपात पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मनापासून आभार मानतो.”
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, सल्लागार सुहेल मुकादम, सचिव युसुफ शिरगावकर, खजिनदार सयीद मुल्ला यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते. सर्वांनी नव्या जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्याला साथ देण्याची ग्वाही दिली.
संपर्क युनिक फाउंडेशन ही संस्था जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर संवेदनशीलतेने काम करणारी अग्रगण्य संस्था असून, नव्या नेतृत्वामुळे तिच्या कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.