(रत्नागिरी)
मोबाईलवर सोशल मीडियावरील फेसबुक रिल पाहत घरी चालत जात असताना मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली. या घटनेत एका तरुणाच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुशिल सुनिल रहाटे (वय ३५, रा. कोळंबे, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिनोलेक्स फाटा ते कोळंबे गाव मार्गावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशिल रहाटे यांचे फिनोलेक्स फाटा परिसरात गॅरेज आहे. रोजच्या प्रमाणे शुक्रवारी रात्री त्यांनी गॅरेजमधील काम आटोपल्यानंतर ते पायी आपल्या कोळंबे येथील घरी निघाले होते. यावेळी चालत असताना ते मोबाईलवर फेसबुक रिल पाहत होते.
दरम्यान, अचानक त्यांच्या हातातील मोबाईलमधून मोठा आवाज झाला आणि मोबाईलचा स्फोट झाला. स्फोट होताच मोबाईल त्यांच्या हातातून खाली पडला. या घटनेत त्यांच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. अचानक झालेल्या स्फोटामुळे काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली होती.
घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मोबाईलचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, मोबाईल चार्जिंग, बॅटरीची स्थिती तसेच अतिवापरामुळे अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी मोबाईल वापरताना काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

